श्रीक्षेत्र माहूर / कार्तिक बेहेरे
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने निर्माण केलेले पाप मिटविण्यासाठी देशद्रोह्याचे कलम काढून टाकण्याची घोषणा करुन अतिरेकी प्रवृत्तीना समर्थन करणाऱ्या काँग्रेस भ्रष्टवादी आघाडीला या निवडणुकीत धडा शिकवा आणि त्यांचे हे पाप श्रीक्षेत्र माहूरगडच्या पापनाशक तलावात बुडवा, असे आवाहन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे रेणूका देवीचे दर्शन करुन त्यांनी आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांना संबोधित केले. प्रचंड उन, उष्णतेचा कहर झाला असतानाही या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या घणाघाती भाषणात काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली. ‘मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांच्यात आपापसात भांडणे लावून काँग्रेस राष्ट्रवादीने आपआपल्या पोळ्या भाजून घेतल्या. सिंचनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम त्यांनी केले. गेली अनेक वर्षे सत्ता त्यांच्या हातात होती, मात्र बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर आदींसाठी कुठलेही ठोस काम केले नाही. मराठवाड्यातील दुष्काळ भीषण होत चालला आहे. या सबंध मराठवाड्यात मी फिरलो, त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. सिंचनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी येवूनही काँग्रेसच्या काळात ती कामे पूर्ण झाली नाहीत. काँग्रेस व भ्रष्टवादी सरकारने केवळ आपल्या तिजोऱ्या भरल्या. दुष्काळाची पाहणी करताना शेतकऱ्यांचे दुःख आम्ही जाणून घेतले. प्रसंगी त्यांना पशुखाद्य दिले. त्याकाळात काँग्रेसचा एकही नेता व कार्यकर्ता शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी फिरला का? लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यात मी फिरलो. त्यावेळी दुष्काळाच्या व्यथा शेतकऱ्यांनी मला सांगितल्या. यामुळे जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. हे काँग्रेस भ्रष्टवादी सरकार आता उलथवून टाकण्यासाठी आणि देशात पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हिंगोलीचा खासदार देखील शिवसेना-भाजपा युतीचाच असला पाहिजे. सिंचनाच्या नावाखाली प्रचंड घोटाळे करुन आपली खिसे भरणाऱ्या या सर्व पापी मंडळींना श्रीक्षेत्र माहूरच्या पापनाशक तलावात बुडवून हिंगोलीत पुन्हा भगव्याचे तेज निर्माण करा आणि शिवसेना,भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सभेच्या सुरुवातीला संध्याताई राठोड, उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांची भाषणे झाल्यानंतर आमदार हेमंत पाटील यांनी आपल्या ओजस्वी भाषणात गेली वीस वर्ष शिवसेनेच्या नावावर सत्ता भोगणाऱ्या गद्दार सुभाष वानखेडे यांच्यावर सडकून टीका केली. ‘होय मी कचरा उचलणाराच कार्यकर्ता आहे, सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता आहे, मात्र मी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो, आपल्या गावात हमाली करणाऱ्या सुभाष वानखेडेंना कुणी वैभव मिळवून दिले, याची जाण त्यांनी ठेवावी, वीस वर्ष शिवसेनेच्या नावावर सत्ता भोगणाऱ्या या गद्दाराला आता त्याची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. या भागाचे मागचे काँग्रेसचे खासदार या भागात कधी फिरकलेच नाहीत, त्यामुळे या भागाचा विकास होऊ शकला नाही. सिंचन, रोजगार यासारखे प्रश्न प्रलंबित राहिले. शेतकरी उपेक्षित राहिला, त्यामुळे या भागाला गतवैभव निर्माण करुन देण्यासाठी, माहूर तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी , बेरोजगारांना नवे उद्योग आणण्यासाठी आणि गद्दाराना गाडून प्रामाणिक शिवसैनिकाला लोकसभेत पाठविण्यासाठी येत्या 18 तारखेला धनुष्यबाणाच्या निशाणीवरच शिक्का मारा आणि प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेनेचे हिंगोली मतदारसंघातील उमेदवार आमदार हेमंत पाटील, शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्वâप्रमुख आनंदराव जाधव, हिंगोली/नांदेड युवासेनेचे विस्तारक अमित गिते, श्याम महाराज भारती, आमदार राजाभाऊ नजरधने, आमदार विप्ल बाजोरीया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार उत्तमराव इंगळे, संध्याताई राठोड, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी कृष्णा पाटील आष्टीकर, महानगरप्रमुख अशोक पाटील उमरेकर, अवतारसिंघ पहरेदार, प्रकाश राठोड, कार्यक्रमाचे संयोजक उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे आदींची यावेळी उपस्थिती होती.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें