ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 3 जुलाई 2026

किनवट-माहूरच्या विकासासाठी शासन कटिबद्ध ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही, सारखणीत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

किनवट-माहूरच्या विकासासाठी शासन कटिबद्ध ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही, सारखणीत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


सारखणी प्रतिनिधी / 

दि. ०१ : हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सारखणी येथे आयोजित महाआरोग्य सर्व रोगनिदान शिबिर, कार्यकर्ता मेळावा व दोन रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी किनवट-माहूरसारख्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधा, शिक्षण व पायाभूत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. याचवेळी त्यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर नाव न घेता टीका करत विकासकामांवर भर देणारे राजकारणच जनतेचा विश्वास संपादन करू शकते, असे मत व्यक्त केले.

शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने सोना गार्डन, सारखणी येथे बुधवारी (दि. १) आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक चौकात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन, दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण आणि शिवसेनेच्या ५१ व्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, संपर्कप्रमुख संदेश पाटील, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, जिल्हा सचिव मनोज तिरमनवार, किनवट तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, शहरप्रमुख तथा नगरसेवक सूरज सातुरवार, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख गंगुबाई परेकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख अजय कदम, सुनील गरड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, स्व. वसंतराव नाईक यांनी शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी केलेले कार्य आदर्शवत असून, त्याच धर्तीवर महायुती सरकार लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत आहे. राज्यात विकासाभिमुख निर्णयांना गती मिळाली असून, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सुरू आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी तसेच पोहरादेवी परिसराच्या उन्नतीसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. किनवट-माहूर हा बंजारा व आदिवासीबहुल दुर्गम भाग असून, या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून किनवट व माहूर येथील वसतिगृहांसाठी प्रत्येकी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. किनवट-माहूर परिसरातील शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय, रायपूर तांडा-ठाकूरवाडी व सिंदखेड-सत्तीगुडा रस्ते, तपोवन एक्सप्रेस व राज्यराणी एक्सप्रेसच्या वेळापत्रकातील बदल तसेच एसटी बससेवा वाढविण्याबाबत मांडण्यात आलेल्या मागण्या नोंदवून घेतल्या असून, त्या संबंधित स्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यभर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे कामही शासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर नाव न घेता टीका करत, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी केवळ टीका करण्यात धन्यता मानणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

आयोजक विशाल जाधव यांनी प्रास्ताविकातून किनवट-माहूर तालुक्यातील वाडी-तांड्यांवरील आरोग्य, रस्ते व इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे खासदार शिंदे यांचे लक्ष वेधले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत डॉ. शिंदे यांनी पक्षाला तळागाळात काम करणारा सक्षम कार्यकर्ता लाभल्याचे गौरवोद्गार काढले.

यावेळी महंत जितेंद्र महाराज, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. दरम्यान, विविध पक्षांतील अनेक सरपंच, सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

महाआरोग्य सर्व रोगनिदान शिबिरात किनवट व माहूर तालुक्यातील नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मारोती सुंकलवाड यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें