ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 16 जून 2026

विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या शेतकऱ्याचे प्राण वाचवण्यात यश; सिंदखेड पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक, सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांची वरिष्ठांनी केली प्रशंशा.

विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या शेतकऱ्याचे प्राण वाचवण्यात यश; सिंदखेड पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांनी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांची केली प्रशंशा.


सारखनी / प्रतिनिधी रशीद फाजलानी 

सारखनी : सिंदखेड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे एका शेतकऱ्याचे प्राण वाचल्याची घटना मंगळवारी (दि. १६ जून) सकाळी मनिरामथड शेतशिवारात घडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरात त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड व पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखेडे हे नियमित गस्तीसाठी वाई बाजारच्या दिशेने जात होते. यावेळी मौजे मनिरामथड येथील शेतशिवारात एका व्यक्तीस शेतातील पाण्याच्या मोटारीच्या विद्युत तारेला करंट लागून तो तारेला चिकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सरकारी वाहन थांबविले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जवळील झाडाच्या लाकडाचा वापर करून संबंधित व्यक्तीस विद्युत प्रवाहापासून सुरक्षितपणे दूर केले. पोलिसांच्या या धाडसी आणि समयसूचक कृतीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले.

सदर व्यक्तीचे नाव दीपक पेटकुळे (रा. करंजी) असे असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सिंदखेड पोलिसांच्या धाडसाचे आणि मानवतेच्या भावनेचे विशेष कौतुक केले. कर्तव्य बजावताना दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परतेमुळे पोलीस दलाविषयीचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड व पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखेडे यांचे विशेष कौतुक केले. कर्तव्य बजावताना दाखविलेले प्रसंगावधान, धाडस आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी ही पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें