किनवट प्रतिनिधी रशीद फाजलानी
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी शिताफीने लंपास केले. ही घटना बुधवारी दि.३१ रोजी सायंकाळी महागाव येथील बसस्थानकावर घडली.
किनवट शहरातील रहिवासी असणाऱ्या सौ. जया किरण ठाकरे (वय ४०) ह्या पंढरपूर-माहूर (क्रमांक एमएच २० बीएल ४००८) या बसने प्रवास करीत होत्या. त्यांचे माहेर करंजखेड असून, त्या महागाव बसस्थानकावरून माहूर येथे जात होत्या. एक किलोमीटर अंतरावर बसचे तिकीट काढताना पर्सची चेन उघडी असल्याची त्यांना दिसली. पर्स तपासून पाहिली असता, त्यामधील सोन्याचा २० ग्रॅम वजनाचा पोहे हार व २० ग्रॅम वजनाचा नेकलेस असे दोन लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच आरडाओरड करीत बस पोलिस ठाण्याकडे वळविण्याची विनंती केली. परंतु बसचालक व वाहकाने बस पुढेच दामटली. तब्बल विस किलोमीटर अंतरावर असलेल्या माहूर येथे जया ठाकरे यांना बसखाली उतरून देण्यात आले. त्यानंतर माहूर आगारात बस जमा करून बसचालक व वाहक निघून गेलेत. बस तेव्हाच महागाव पोलिस ठाण्यात नेऊन संशयितांची झाडाझडती घेतली असती, तर दागिने नक्कीच मिळाले असते. परंतु बसचालकाने व वाहकाने हेतुपुरस्सरपणे बस थांबविली नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेत त्या दोघांचाही हातभार असल्याची तक्रार महिलेने महागाव पोलिसांकडे दिली आहे. याबाबत पुढील तपास ठाणेदार दीपक ढोमणे करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें